कोपरगाव : तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेला असून जेऊर कुंभारी, कोकमठाण, पुणतांबा, संवत्सर या भागात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत.डॉ.यशराज महानुभाव यांच्या प्रयत्नातून जेऊर कुंभारी येथे भव्य दिव्य अशा श्रीकृष्ण मंदिराच्या स्लॅबचे पूजन करून हे मंदिर पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील महानुभाव पंथीयांनाच नावे तर सर्व धर्मीयांसाठी आकर्षण ठरणार असून या भागातील धार्मिक स्थळांमध्ये भरच पडणार आहे. कोपरगाव तालुक्यातील नाही, तर आजूबाजूच्या तालुक्यातील सद भक्तांचा या मंदिरात मेळावा भरेल.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
जेऊर कुंभारी भागातील पुणतांबा फाटा ते चांदेकसारे रोड लगत महानुभाव संप्रदायाचे डॉ.यशराज महानुभाव यांच्या प्रयत्नातून भव्य अशा श्रीकृष्ण मंदिराच्या स्लॅब पूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार डॉ.यशराज महानुभाव यांनी केला तर समता परिवाराच्या वतीने डॉ.यशराज महानुभाव यांचा सत्कार काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की , कोपरगाव तालुक्यातील या भागांमध्ये धार्मिक मंदिरांप्रमाणेच समता इंटरनॅशनल स्कूल, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, संत जनार्दन स्वामी विद्यालय, रेनबो इंटरनॅशनल स्कूल यांसारखी ज्ञान मंदिरे ही असून या ज्ञान मंदिरांनी शिक्षण क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविलेला आहे. तसेच डॉ. महानुभाव यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही एक मंदिर उभारावे. यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळच असलेल्या समृद्धी महामार्गामुळे चांगला फायदा होईल. तसेच उद्योग मंदिरेही उभारावीत यासाठी समता नेहमी आपल्याला सहकार्य करेल.
डॉ.यशराज महानुभाव प्रास्ताविक करताना म्हणाले की , श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अहिंसावादी, जातीभेद विरहित समाजाचा प्रचार आणि प्रसार , महानुभाव संप्रदायाचे आचार, विचार, तत्त्वज्ञान समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचावे यासाठी दोन वर्षापासून भव्य अशा श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम चालू असून एक वर्षात या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जाणार आहे. मंदिराचा कळस जमिनीपासून १०१ फुटांपर्यंत असणार असून पहिल्या मजल्यावर श्रीकृष्णाचे मंदिर आणि जमिनीलगत ध्यान पीठ बांधण्यात येणार आहे. मंदिराचे बांधकाम श्री.विनित बोडखे, श्री. शांताराम नागरे, श्री. विठ्ठल सांगळे या कॉन्ट्रॅक्टरांमार्फत चालू आहे.जेऊर कुंभारीत जुने श्रीकृष्ण मंदिर शिर्डी – मनमाड रोड लगत होते, पण समृद्धी महामार्गामुळे त्या रोडवर न राहता पुणतांबा – चांदेकसारे रोड लगत याच गावात आपल्या सर्वांच्या सहकार्याने भव्य स्वरूपात बांधण्यात येत आहे. यात आपल्या सर्वांचा सिंहाचा वाटा असून यापुढे ही असाच असावा.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महानुभव संप्रदायाचे श्री.संदीप महानुभाव यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, येवला येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे विश्वस्त सिताराम आंधळे, कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश आव्हाड, काळे सहकारी साखर कारखान्याचे रामनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर सिनगर, कारभारी परजणे, विठ्ठलराव आव्हाड, विलासराव आव्हाड, विजय रोहोम, साहेबराव गाडेकर, मधुकर वक्ते, मेघनाथ शिंदे आदींसह सदभक्त परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.उपस्थितांचे आभार विलास आव्हाड यांनी मानले.