20.6 C
New York
Monday, May 27, 2024

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. अतिवृष्टीने आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून, कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यास त्याचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरू असलेली ही सक्तीची वीज बिल वसुली व वीज तोडण्याची मोहीम तातडीने थांबवून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे की, सध्या शेतात रब्बी, उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित असलेल्या वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.

रब्बी पिकांना शेवटचे पाणी देण्याची वेळ आली असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल थकले म्हणून कृषिपंपाची वीज तोडत आहेत. महावितरण कंपनीकडून कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गतवर्षी पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीने झोडपल्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्न करत आहे. सध्या शेतात रब्बी पिके उभी असून, या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे; परंतु थकित वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी आधीच अनियमित आणि कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यात सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडल्यास त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असून, विजेअभावी पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांवर वीजबिल आले आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे व आर्थिक अडचणींमुळे सध्या हे वीजबिल शेतकरी भरू शकत नाहीत. महावितरण कंपनीने वीजबिलाची थकबाकी दोन हप्त्यात भरण्याची सवलत दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, याकडे स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना किमान पंधरा दिवस अगोदर सूचना दिली पाहिजे. मात्र, तसे न करता महावितरण कंपनीचे अधिकारी व्हॉटसअॅपवर इंग्रजी मेसेज पाठवतात. सर्व शेतकरी सुशिक्षित नाहीत. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. ते व्हॉटसअॅप वापरत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ते समजू शकत नाही. ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

महावितरणने थकित वीजबिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणने शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि त्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles