17.8 C
New York
Monday, October 2, 2023

दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; स्नेहलता कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

कोपरगाव : कोपरगाव येथील रहिवासी दत्तात्रय दिनकर पवार यांची मुलगी दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची त्वरित सखोल चौकशी करावी. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बुधवारी (२१ जून) उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (२१ जून)  पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता स्नेहलताताई कोल्हे यांनी फडणवीस यांना भेटून यासंदर्भात निवेदन देऊन दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल व आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोल्हे यांना दिले. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमर साबळे आदी उपस्थित होते.   

स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर्शना दत्तात्रय पवार (वय २६) ही कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रहिवासी होती. दर्शनाचे वडील दत्तात्रय दिनकर पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून संजीवनी उद्योग समुहात काम करतात. सहजानंदनगर (ता. कोपरगाव) येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कॉलनीत पवार कुटुंबीय वास्तव्यास आहे. दर्शना पवार ही उच्चशिक्षित व गरीब कुटुंबातील गुणी मुलगी होती. मार्च २०२३ मध्ये ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. दर्शना पवार हिची परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) पदासाठी निवड झाली होती. 

दर्शना पवार ही ९ जून रोजी पुण्यातील एका संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी  पुण्याला गेली होती. दुसऱ्या दिवशी दर्शनाच्या कुटुंबीयांचा तिच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क झाला; परंतु त्यानंतर तिचा संपर्क होत नसल्यामुळे दर्शनाचे वडील दत्तात्रय पवार यांना शंका आल्याने त्यांनी ताबडतोब पुणे जाऊन चौकशी केली. मात्र, दर्शना हिचा काहीही तपास लागत नसल्याने त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

सिंहगड रोड पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर १८ जूनला दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या गुंजवणे गावच्या हद्दीत राजगड किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. दर्शना पवार हिच्या शरीरावर जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या असून, त्यामुळे तिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे दर्शना पवार हिच्या मृत्यूची लवकरात लवकर सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे. 

दर्शना ही दत्तात्रय पवार यांची एकुलती एक मुलगी होती. दर्शना हिने अतिशय कष्टाने अभ्यास करून ‘एमपीएससी’ मार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. अगदी तरुण वयात दर्शना पवार हिच्या मृत्यूचे वृत्त सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे. दर्शना हिला जीवनात आणखी खूप मोठे व्हायचे होते; पण तिच्या अकाली मृत्यूमुळे तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दर्शनाच्या मृत्यूमुळे दत्तात्रय पवार व त्यांच्या कुटुंबीयांना अपार दु:ख झाले आहे. दर्शनाच्या मृत्यूची ताबडतोब चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles