6.6 C
New York
Friday, March 29, 2024

गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

कोपरगाव : गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. मात्र, सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे, या पिकांना पाणी वेळीच पाणी न मिळाल्यास पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करून गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेच्या म्हणजे १ मार्चच्या आधी १५ फेब्रुवारीपर्यंत आवर्तन सोडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. 

जलसंपदा (पाटबंधारे) विभागाने घेतलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन (रोटेशन) देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.

यावर्षी धरण क्षेत्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्याला रब्बी हंगामात एक आणि उन्हाळी हंगामात तीन असे चार आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार नियोजित वेळापत्रकाप्रमाणे यातील पहिले रब्बीचे आवर्तन हे १ जानेवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र, बिगरसिंचनासाठी व सिंचनासाठीचे आवर्तन पाच दिवस अगोदरच सोडण्यात आले होते.

पूर्वी रब्बी हंगामातील आवर्तन ३० ते ३५ दिवस चालायचे; परंतु यंदा रब्बीचे आवर्तन कमी दिवस चालले. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडला. शेतकऱ्यांची पिके शेतात उशिरा उभी राहिली. पावसामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात विहिरींना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यांचे पाणी शेतीसाठी वापरले नाही. त्यात कालवे म्हणजे आवर्तन लवकर बंद झाले. 

सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे. गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. जर पाटबंधारे खात्याने ठरल्याप्रमाणे १ मार्चला आवर्तन सोडले तर ४ मार्चपर्यंत पाणी खालपर्यंत येईल आणि हे आवर्तन पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी जाईल. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक लागणार नाही.

ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेला म्हणजे १ मार्चला आवर्तन सोडण्याऐवजी त्याच्या अगोदर आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेच्या आधी १५ फेब्रुवारीच्या आत आवर्तन सोडावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.   

सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका व इतर पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढत असून,  सध्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. जर पिकांना पाणी मिळाले नाही तर पाण्याअभावी पिके वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन गोदावरी डावा व उजवा कालव्याला १ मार्चपूर्वी लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडल्यानंतर आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. हे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालवे बंद करू नयेत. टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे. पाटबंधारे विभागाने लवकर आवर्तन सोडून पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे. नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही कोल्हे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles