कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथील संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू पाटील कोळपे व विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अण्णांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून विद्यालयापासून ते कोळपेवाडी ग्रामपंचायत पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये व्यसनमुक्ती, साक्षरता अभियान, स्त्री पुरुष समानता, सर्वधर्म समभाव, जलसुरक्षा, लेख वाचवा अभियान, स्त्रीभ्रूण हत्या,विविध समाज सुधारकांची व नेत्यांची वेशभूषा यातून समानतेचा संदेश देणाऱ्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करून समाजप्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे मिरवणुकीत झांज व लेझीम पथक, नृत्य पथक, एन.सी.सी. व स्काऊट पथक यांचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले. सदर मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान समिती सुरेगाव, कारखाना कार्यस्थळावरील शेतकी विभाग, स्व.शंकरराव काळे स्मृती उद्यान समिती, ग्रामपंचायत कोळपेवाडी, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी यांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथाचे स्वागत केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, पर्यवेक्षक लक्ष्मण कुदळे, कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्या हेमलता गुंजाळ, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक सुरेश खंडीझोड, संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,ज्यु.कॉलेज विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे, किमान कौशल्य विभाग प्रमुख अविनाश शिंदे,आप्पासाहेब आगवन,बाळासाहेब ढोमसे, पत्रकार विशाल लोंढे, सर्व सेवक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.