19.6 C
New York
Monday, May 27, 2024

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

कोपरगाव- ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या पुरुष व महिला संघांनी शानदार कामगिरी करत पदकावर नाव कोरले. पुरूष संघाने सुवर्ण पदक तर महिला संघाने कांस्य पदक प्राप्त केले. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने यजमान पंजाब संघाला ३-२ होमरनांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या विजयात कोपरगावच्या खेळाडूंची कामगिरी चमकदार राहिली.

कोपरगावच्या अक्षय आव्हाड, कन्हैय्या गंगुले व शमित माळी यांनी पुरूष संघाचे तर वैष्णवी कासार व दुर्गा आव्हाड यांनी महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. अक्षय आव्हाडला सर्वोत्कृष्ट पिचर अवॉर्ड, कन्हैय्या गंगुलेला सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार मिळाला. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (पंजाब) येथे राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. त्यासाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्र संघाचे सराव शिबीर एसएसजीएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडले होते.

विविध राज्यांच्या बलाढ्य संघांना धूळ चारत स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी एकतर्फी राहिली. अंतिम सामन्यात अक्षय आव्हाडने भेदक पिचिंग करत महाराष्ट्राच्या विजयाची वाट सुकर केली. कन्हैय्या गंगुले, ऋषिकेश रावुळ, शमित माळी, मुस्तकीम पिरजादे, विनीत सकपाळ, अक्षय मोगल यांची अंतिम सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय राहिली.

अक्षय आव्हाड व कन्हैय्या गंगुले हे केजेएस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तर शमित माळी हा संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आजवर तिन्ही खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली होती. तर श्रीलंका येथे पार पडलेल्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेत अक्षय व कन्हैय्या या दोघांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. केजेएस महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ.सुनील कुटे यांचे मार्गदर्शन सर्वांना लाभले आहे.

बेसबॉल सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ ग्रामीण मातीत रुजतो आहे. पुरेसे साहित्य संसाधन उपलब्ध नसताना जिद्द व मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय स्तरापर्यंत कोपरगावच्या खेळाडूंनी झेप घेतली आहे. विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर, अहमदनगर बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, सचिव मकरंद कोर्हाळकर, सदस्य अंबादास वडांगळे, राजेंद्र पाटणकर आदींनी अभिनंदन केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles